२ मार्च म्हणजे नव्या महिन्याचा पहिला शनिवार असूनही शेअर बाजार सुरू राहणार असून बाजारात स्पेशल ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाणार आहे. सर्वसाधारणपणे शनिवार आणि रविवारच्या दिवशी राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व मुंबई शेअर बाजार (BSE) मध्ये कामकाज बंद असते मात्र, यंदा तसं होणार नाही.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) द्वारे २ मार्च (शनिवार), २०२४ रोजी एक विशेष लाइव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाईल ज्यामध्ये, इंट्राडे डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटवर स्विच केले जाईल. कोणतीही अनपेक्षित घटना घडल्यास एक्सचेंजेस मजबूत करण्यासाठी विशेष सत्र आयोजित केले जात आहे, ज्यामुळे त्यांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. बुधवारी देशातील दोन्ही प्रमुख स्टॉक एक्सचेंजने परिपत्रक जारी करून २ मार्च रोजी होणाऱ्या या सत्रात इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये ट्रेडिंग होणार असल्याची माहिती दिली.