महिंद्रा मनुलाइफ फोकस्ड फंडाला १९ नोव्हेंबर रोजी तीन वर्षे पूर्ण होत असल्याने या फंडाची दखल घेणे उचित ठरते.
मागील तीन वर्षांचा विचार केल्यास हा फंड सातत्याने ‘टॉप’ किंवा ‘अपर मिडल क्वारटाइल’ मध्ये राहिला आहे. या फंडात १९ नोव्हेंबर २०२० मध्ये गुंतविलेल्या १ लाखाचे १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार १,९०,३९६ (वार्षिक लाभ २४.०४ टक्के) झाले होते आणि १९ नोव्हेंबर २०२० रोजी पाच हजार रुपयांची ‘एसआयपी’ सुरू केलेल्या १,०८,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार २,३६,७३४ झाले (वार्षिक लाभ १८.६६ टक्के) आहेत.
मॉर्निंगस्टार एखाद्या फंडाला तीन वर्षांनंतर ‘स्टार रेटिंग’ बहाल करते. फंडाच्या चमकदार कामगिरीमुळे या फंडाला चार तारांकित (‘फोर स्टार’) किंवा पंचतारांकित (‘फाइव्ह स्टार रेटिंग’) मिळण्याची शक्यता आहे. या फंडाला जर ‘फोर स्टार’ किंवा ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ मिळाले तर पदार्पणात ‘फोर स्टार’ किंवा ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ मिळविणाऱ्या १५ टक्के फंडात या फंडाची गणना होईल. पदार्पणात ‘फोर स्टार’ किंवा ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ मिळविणे म्हणजे पदार्पण केलेल्या कसोटी सामन्यात शतक झळकवण्यासारखे आहे.
या फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ८७९.०५ कोटी रुपये आहे. रेग्युलर प्लानचा व्यवस्थापकीय खर्च २.२ टक्के असून फंडाचा मानदंड (बेंचमार्क ) ‘निफ्टी ५०० टीआरआय’ आहे. या फंडाचे कृष्णा संघवी हे मुख्य निधी व्यवस्थापक तर फातिमा पाचा या सहनिधी व्यवस्थापिका आहेत. काही गुंतवणूकदारांचा (यूट्यूब पाहून गुंतवणूक करणाऱ्या) असा गैरसमज आहे की, फोकस्ड फंड हे थीमॅटिक किंवा सेक्टर फंड्सइतकेच धोकादायक असतात. परंतु महिंद्रा मनुलाइफ फोकस्ड फंडाने १३ उद्योग क्षेत्रात गुंतवणूक केल्याने, जोखीम कमी केली आहे. तथापि, अधिक वैविध्यपूर्ण फंडांच्या तुलनेत फोकस्ड फंडांमध्ये कंपन्यांच्या ध्रुवीकरणाचा धोका किंचित जास्त असतो. महिंद्रा मनुलाइफ फोकस्ड फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ३० कंपन्यांचा समावेश आहे. आघाडीच्या ५ उद्योगक्षेत्रातील गुंतवणूक ४५ टक्के आहे. आघाडीच्या ५ कंपन्यांतील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या ३५ टक्के आहे. या फंडाची शिफारस करण्यामागे फंडाच्या कामगिरीतील सातत्य हे कारण आहे. ‘पॉइंट टू पॉइंट’ किंवा ‘ट्रेलिंग रिटर्न’ अनकेदा दिशाभूल करणारे असू शकतात, विशेषतः सध्याची बाजार परिस्थिती फंड व्यवस्थापकाला अनुकूल आहे.