अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलेल्या कर रचनेत त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कररचनेमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. प्राप्तिकराच्या रचनेत बदल होणा नसल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्यामुळे करदात्यांसाठी परिस्थिती जैसे थेच असेल.
आम्ही अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा कायम राखत आहोत, असं अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या. अंतरिम अर्थसंकल्पात लोकानुनय करणाऱ्या घोषणा केल्या जात नाहीत. त्यामुळेच मोदी सरकारनंही निवडणुकीआधीच्या अर्थसंकल्पात लोकानुनयी घोषणा टाळल्या. कर रचनेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. वार्षिक ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.
रेल्वेचे ४० हजार डबे ‘वंदे भारत’प्रमाणे करण्याची घोषणा निर्मला सीतारमन यांनी केली. नमो भारत आणि मेट्रोमुळे शहरांतील अंतर कमी झाले आहे. या दोन्ही रेल्वे सेवांचा विस्तार केला जाईल. प्रवासी गाड्यांच्या संचालनात सुधारणा होईल, तसेच प्रवाशांची सुरक्षा वाढून प्रवासाचा वेगही अधिक होईल. मेट्रोचे जाळे वाढवण्यावर सरकारचा भर राहील, असे निर्मला सीतारमन यांनी सांगितले. दुसरीकडे, वीजेवरील बसेसना प्राधान्य देण्यात येणार असून जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन्ससाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
देशात नवीन १४९ विमानतळ उभारणार असून ५१७ नवे विमानमार्ग प्रस्तावित आहेत. विमान वाहतूक क्षेत्राचा मागील १० वर्षांत कायापालट करण्यात आला असून येत्या काही वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट होणार असल्याचंही त्या म्हणाल्या.