म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी पैसे भरण्याची पद्धत १ एप्रिलपासून बदलणार आहे. आतापर्यंत, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी धनादेश, बँक ड्राफ्ट किंवा इतर माध्यमाद्वारे पैसे दिले जात होते. मात्र १ एप्रिलपासून असे होणार नाही. म्युच्युअल फंड ट्रान्झॅक्शन एग्रीगेशन पोर्टल एमएफ युटिलिटीज ३१ मार्च २०२२ पासून चेक आणि डीडीद्वारे गुंतवणुकीसाठी पैसे देण्याची सुविधा बंद करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी पैसे देण्यासाठी इंटरनेट बँकिंग आणि UPI पेमेंटचा पर्याय शिल्लक राहील.
करोना महामारीमुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी पैसे देण्याची पद्धत फार पूर्वी बदलली आहे. तज्ज्ञांच्या मते, सोशल डिस्टन्सिंगमुळे बहुतेक ग्राहक UPI आणि नेट बँकिंगद्वारे गुंतवणूकीसाठी पैसे देत आहेत. त्यामुळे चेक, डीडी, आरटीजीएस आणि एनईएफटी पर्याय बंद केल्याने फारसा परिणाम होणार नाही.