सार्वभौम सुवर्ण (गोल्ड) बाँड योजनेद्वारे सरकार बाजार दरापेक्षा कमी किमतीत सोन्याची विक्री करते. जागतिक तसेच भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतींनी आस्मान गाठले असताना आता नवीन वर्षातही गुंतवणूकदारांना या योजनेत सोने खरेदी करता येईल. सार्वभौम सुवर्ण बाँड योजना २०२३-२३ ची पुढील मालिका १२ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केली जाईल आणि या योजनेत १६ फेब्रुवारीपर्यंत सोने खरेदी करता येईल. सरकारच्या या योजनेंतर्गत बाजारापेक्षा कमी किंमतीत सोन्यात गुंतवणूक करता येते. ही सरकारी योजना असून यामध्ये भारत सरकार गुंतवलेल्या पैशाच्या सुरक्षिततेची हमी देते. केंद्र सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) रोखे जारी करते.
इतके सोने खरेदी करता येईल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुम्ही सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला किमान एक ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल. त्याच वेळी वैयक्तिक चार किलो सोने, एचयूएफ चार किलो आणि ट्रस्टच्या नावावर जास्तीत जास्त २० किलो सोने खरेदी करता येईल.