इक्विटी म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे. जानेवारी महिन्यात या फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी एकूण २१ हजार ७८० कोटी रुपये गुंतवले आहेत. ही रक्कम गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक मासिक गुंतवणूक ठरली आहे. यंदा जानेवारी महिन्यात नियोजनबद्ध गुंतवणुकीचा (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी) उच्चांक गाठला गेला आहे. ही माहिती म्युच्युअल फंडाची मध्यवर्ती संघटना असलेल्या अॅम्फीने गुरुवारी दिली.
डिसेंबर २०२३मध्ये एसआयपीच्या माध्यमातून १७ हजार ६१० कोटी रुपये गुंतवले गेले होते. जानेवारी महिन्यात १८ हजार ८३८ कोटी रुपये एसआयपीद्वारे गुंतवले गेले. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये डिसेंबर २०२३मध्ये १६ हजार ९९७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. जानेवारीत त्यात २८ टक्के वाढ झाली आणि २१ हजार ७८० कोटी रुपयांची गुंतवणूक या फंडांमध्ये झाली.
इक्विटी फंडांतील स्मॉल कॅप फंडांनी सलग चौथ्या महिन्यात तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित केली आहे. अन्य फंडांच्या तुलनेत लार्ज कॅप फंडांमध्ये १,२८७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक अन्य फंडातील गुंतवणउकीच्या तुलनेत कमी दिसत असली तरी या गटातील फंडांत मागील १९ महिन्यांतील ही सर्वाधिक गुंतवणूक ठरली आहे. लार्ज कॅप फंडांतून डिसेंबर २०२३मध्ये २८१ कोटी रुपये काढून घेतले गेले होते.