येत्या दिवसात भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड होणार आहे का? अशी शंका सातत्याने विचारात घेतली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदार भारतीय स्टॉक मार्केटवर फिदा झाले होते आणि एका पाठोपाठ एक त्यांनी गुंतवणूकीचा धडाका लावला, पण आता परदेशी गुंतवणूकदारांनी अचानक पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. विदेशी गुंतवणूकदार म्हणजे FPI ने या महिन्याच्या (जानेवारी) पहिल्या तीन आठवड्यांत भारतीय बाजारातून आतापर्यंत १३,००० कोटी रुपयांहून अधिक पैसे काढले आहेत.
आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी या महिन्यात (१९ जानेवारीपर्यंत) भारतीय शेअर्समधून १३,०४७ कोटी रुपये काढले असून १७ ते १९ जानेवारी दरम्यान २४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकले. यापूर्वी डिसेंबरमध्ये एफपीआयने शेअर्समध्ये ६६,१३४ कोटी रुपये आणि नोव्हेंबरमध्ये ९,००० कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती.
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले की, एफपीआयकडून विक्रीची दोन कारणे आहेत. अमेरिकेत बाँडवरील रिवॉर्ड वाढत असून १० वर्षांच्या रोख्यांवर उत्पन्न अलीकडील ३.९% वरून ४.१५ टक्क्यांपर्यंत वाढले, ज्यामुळे उदयोन्मुख बाजारांमधून भांडवलाचा प्रवाह वाढला आहे.