प्राप्तिकर कायद्याप्रमाणे कोणत्याच सदराखाली न येणारे करपात्र उत्पन्न हे ‘इतर उत्पन्न’ या सदरात मोडते. इतर स्त्रोतांतील उत्पन्नाचे सर्वात सोपे उदाहरण म्हणजे बँकेतील मुदत किंवा बचत खात्यावरील व्याज. तसेच कंपन्यांकडून मिळणारा लाभांश, ठेवी व बॉण्ड्सवरील व्याज, किंबहुना कोणत्याही गुंतवणुकीवर मिळणारे व्याज हे या सदरात करपात्र होते. या व्यतिरिक्त लॉटरी, घोड्याच्या शर्यतीमध्ये जिंकलेली रक्कम, वेगवेगळ्या स्पर्धांमधील बक्षिसाची रक्कम, सट्टा व्यवहारातील कमाई अशा उत्पन्नांवरही याच सदराखाली कर भरावा लागतो.
पोटभाडेकरू
जर भाडेकरूने घरात पोटभाडेकरू ठेवला तर त्यापासून त्याला मिळणारे भाडे देखील इतर उत्पन्न या सदराखाली धरले जाते. पतीच्या निधनानंतर पत्नीला मिळणारे कुटुंब निवृत्ती वेतन (फॅमिली पेन्शन), यंत्रसामग्री, फर्निचर जर भाड्याने दिले असेल तर त्यापासून मिळणारे भाडेही या सदराखाली दाखवावे लागते.
मिळणाऱ्या भेटी
नातेवाईक सोडून मित्रमंडळी किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मिळालेल्या भेटी (gifts) यादेखील याच सदराखाली करपात्र होतात. यात या व्यक्तींकडून वर्षभरात मिळालेल्या लहानसहान रकमा एकत्रितपणे जर ५० हजार रुपयांपेक्षा अधिक होत असतील तरी मिळालेली पूर्ण रक्कम उत्पन्न म्हणून दाखवावी लागते. मात्र लग्नात वर किंवा वधूला मिळालेल्या भेटी पूर्णपणे करमुक्त असतात. त्यामुळे लग्न समारंभ सोडून इतर प्रसंगी भेटी स्वीकारताना त्या वस्तूरूपाने स्वीकारणे करनियोजन ठरू शकते.
नातलगांकडून मिळणाऱ्या भेटी
नातेवाईकांकडून पैशाच्या व वस्तूस्वरूपात मिळालेल्या भेटी सर्व प्रसंगी करमुक्तच असतात. त्याला ५० हजार रुपयांची मर्यादा लागू नाही. नातेवाईक या शब्दाच्या व्याख्येत आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकू, आत्या, मावशी व त्यांचे यजमान, मामा, मामी, सख्खा भाऊ व बहीण, त्यांचे जोडीदार (पती व पत्नी), सासूसासरे, मेव्हणा-मेव्हणी व त्यांचे जोडीदार अशा बऱ्याच जणांचा समावेश होतो. यापैकी कोणीही कधीही कितीही रक्कम रोखीने किंवा बँकेत भेट म्हणून दिली तरी कोणताही कर लागत नाही.
वस्तूरूपात भेटी
कोणाकडूनही वस्तूरूपाने कितीही किंमतीच्या भेटीवर कर लागत नाही. समजा माझ्या मित्राने मला महागडा टीव्ही सेट भेट म्हणून दिला तरी मला कोणताही कर द्यावा लागणार नाही. मात्र शेअर्स, सोनेचांदी किंवा मौल्यवान धातूंचे दागिने किंवा वस्तू तसेच पुराणकालीन जतन केलेल्या वस्तू, पेंटिंग्ज या वस्तूंच्या भेटी करपात्र आहेत.
मालमत्तेचा खरेदी करार
इतर उत्पन्न या सदरात अजून एका महत्त्वाच्या बाबीचा विचार होणे जरुरीचे आहे. तो म्हणजे घर किंवा जमीनजुमला खरेदी करताना कराराची किंमत जर मुद्रांक शुल्क मूल्याच्या १० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर मुद्रांक शुल्क मूल्य आणि कराराची किंमत यातील फरक हा उत्पन्न म्हणून घर घेणाऱ्याला या सदराखाली दाखवावा लागतो. समजा एखाद्या मालमत्तेचे मुद्रांक शुल्क मूल्य ७० लाख रुपये असेल आणि करार ६० लाख रुपये या किंमतीला झाला तर मालमत्ता घेणाऱ्याला १० लाख रुपये उत्पन्न म्हणून दाखवून त्यावर स्लॅबप्रमाणे कर भरावा लागेल याची नोंद घर जमीन घेणाऱ्या सर्व वाचकांनी घ्यावी. या उदाहरणात जर करार ६३ लाख रुपये किंवा अधिक किंमतीत झाला असता तर वरीलप्रमाणे कर लागला नसत